:  प्रस्तावना : 

 

         पाथरी तालुक्यात एकूण ५६ गावे आहेत. तालुक्याची २००१ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागाची लोकसंख्या ७८२१७ एवढी आहे. तालुक्यात एकूण ४९ ग्रामपंचायती असून गावाचा कारभार ग्रामपंचायती मार्फत चालतो. हा तालुका ढोबळ मानाने रब्बी तालुका म्हणून ओळखला जातो.
       तालुक्याचे जमिनीचे क्षेत्रफळ ५४८३५ हेक्टर आहे. या तालुक्यात गोदावरी नदी वाहत असल्यामुळे येथील जमीन सुपीक बनली आहे. या तालुक्याचे पर्जन्यमान अंदाजे ८१४ मी. मी. आहे. पाथरी तालुक्यास ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले असून पूर्वीचे पाथरी शहराचे नाव पार्थपूर असे होते याच नावावरून कालांतराने पाथरी असे नाव झाले आहे. पाथरी शहर हे श्री.साईबाबा यांचे जन्मस्थान असल्यामुळे या तालुक्यास धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.या तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर बरीचशी पुरातन मंदिरे असल्याने हा तालुका धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. जसे की, मौजे गुंज खु. येथे परमपूज्य श्री.योगानंद महाराज यांची समाधी आहे. मौजे रामपुरी खु. येथे रत्नश्वराचे मंदिर असून या मंदिरास पुरातन काळापासून आख्यायिका प्राप्त झालेली आहे.तसेच मौजे मुदगल येथे मुदगलेश्वराचे मंदिर आहे.ही सर्व देवस्थाने गोदावरी नदीच्या काठावर वसली असल्याने या ठिकाणी अगदी निसर्गरम्य वातावरण असते. हेच निसर्गरम्य वातावरण भाविकांना भुरळ घालते त्यामुळे नेहमी या ठिकाणी भाविकांची गर्दी पहावयास मिळते. तसेच पाथरी तालुक्यात एकूण ०४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या अंतर्गत एकूण २० उपकेंद्र आहेत. तसेच पशुसंवर्धन विभागा अंतर्गत तालुक्यात एकूण ०४ श्रेणी-२ चे दवाखाने असून पाथरी येथे ०१ पशुचिकित्सालय कार्यरत आहे.तसेच तालुक्यात जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळा ०६ अंतर्गत प्राथमिक शाळा ९०  अशा एकूण ९६ प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा एकूण ०३ आहेत. शाळाबाह्य मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका  विद्यालय ०१ असून ते पाथरी शहरात सुरु आहे. इंग्रजी माध्यमाचे ०१ मॉडेल स्कूल जून २०१२ पासून तालुक्यात सुरु झालेले आहे.

Online: